Monday, July 26, 2010

मागे वळून पहाताना..

आज वयाची ३५ वर्षे पुर्ण झाली.. अजूनही मोठे झाल्यासारखे वाटत नाही.. मन अजूनही आयुष्यात स्थिरावल्यासारखे वाटत नाही.. अजून वाटते काहीतरी मिस होतंय.. माझंच आयुष्य जगतोय असे वाटत नाही.. प्रत्येकवेळी नवीन विचार, नवीन आशा, नवी स्वप्ने.. आणि पुन्हा नव्याने स्वप्नभंग..

शाळेत असताना वाढदिवसाची वेगळीच गंमत होती.. केक कापून वगैरे कधी वाढदिवस साजरा व्हायचा नाही.. आई ओवाळायची.. काहीतरी गोड.. मग संध्याकाळी मित्रांना बोलवायचे.. मेनू जवळपास सेमच असायचा.. भडंग आणि जिलेबी.. कधीतरी इकडेतिकडे होत असेल..

पण बंधूसाठी [सुहास] मात्र माझा वाढदिवस जिव्हाळ्याचा विषय असायचा.. त्याच एकूनच माझ्यावर खूप प्रेम.. तेवढ्याच अपेक्षापण.. [मी त्या पूर्ण करू शकलो नाही ही गोष्ट अलाहीदा..] पण मी कॉलेजला असताना वाढदिवसाच्या वेळी कुंडलला जायचो त्यावेळी तो न चुकता मला ड्रेस घ्यायचा.. हे त्याचे नेहमीचे ठरलेले.. मग परत येताना पैसे द्यायचा.. मी परत येताना खूप भावनाविवश व्हायचो.. या सगळ्यांची स्वप्ने पूर्ण करायची.. मोठे व्हायचे.. यांना सुख द्यायचे.. असे विचार एसटीत बसलो की करत र्‍हायचो..

आज मागे वळून पहाताना वाटते.. आता प्राधान्यक्रम खूप बदलले आहेत.. दर महिन्याची तोंडमिळवणी हीच एक प्राथमिक गरज बनली आहे.. आणि माझ्याविषयीच्या घरच्यांच्या स्वप्नांना माझ्या मुलात बघतोय.. अर्थात असे असले तरी खोलवर उरात अजूनही आशा जिवंत आहे..

मागे वळून बघताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट जाणवते ती म्हणजे मी कमालीचा बदललो.. मी जसा होतो आणि जसा आहे यात खूपच अंतर आहे.. आणि याबद्दल मात्र मला नितांत अभिमान आहे.. आणि अजूनही ती बदलाची प्रक्रिया चालूच आहे.. नित्यनवे चांगले विचार आत्मसात करायचे, अंगवळणी पाडायचे.. आणि जसे आपण अंघोळ करुन आरशासमोर आपले स्वच्छ रूप पहातो तसे स्वत:ला पहायचे.. ही एक प्रकारची स्वयंप्रेरणाच असते..

यश हे आभासी असते असे मला वाटते.. म्हणजे क्षितीजासारखे.. यदाकदाचित क्षितीजावर पोहोचलो तरी काही क्षणांत समोर दुसरे क्षितीज दिसू लागते..

एक गोष्ट नक्की आहे.. पूर्वी मी जेव्हा वाटचालीचा आढावा घ्यायचो तेव्हा केवळ निराशच व्हायचो.. काय नाही तेच दिसायचे.. पण आता मात्र काय कमी आहे याबरोबरच काय काय आहे हेही दिसते.. हेही नसे थोडके!!

अन आजच्या दिवशी मी आशा करतो की असा दिवस येईल की त्यादिवशी मला "काय काय आहे" एवढेच दिसेल..

थ्री चिअर्स....
काल अमीरखानची मुलाखत.. नाही, सुनावणी म्हणू.. आप की अदालत मध्ये बघितली.. त्याचे विचार, काम करण्याची पद्धत, त्याची भावनाशीलता सगळं पाहून वाटतं, मी त्याच्यासारखाच आहे.. फरक इतकाच की तो त्याच्या जॉनरमध्ये काम करतोय.. आणि मी नुसताच तसा विचार करतोय.. खरंय.. गेले कित्यैक दिवस मी आवडीच्या क्षेत्रात जाऊन काम करण्याचा विचार करतोय.. पण.. पुन्हा पण.. पाऊल उचलत नाही.. अभिनय, फोटोग्राफी आणि अलीकडे जरा जवळ्चे वाटणारे "समुपदेशन" चे क्षेत्र मला जवळचे वाटतात.. पण कळत नाही काय करायचे..

Saturday, July 24, 2010

आज गुरुपोर्णिमा॥ मला गुरूची गरज आहे.. पण माझी अशी धारणा आहे की गुरू शोधून सापडणार नाही। विश्वाचे नियोजन काटेकोर असते असे मी मानतो.. योग्य वेळी, मिळणार असेल तर, गुरू मिळेलच.. मग आज पूजा करतानाच गुरुदेव द्त्तांकडे त्यांनीच माझे गुरुपद घ्यावे अशी प्रार्थना केली..

आजची सकाळची पुरवणी "कौटुंबिक विसंवाद" या विषयांवर आहे॥ आमच्या त्रिकोणी कुटुंबात पण काही वेगळी परिस्थिती नाही, पण मी माझे प्रयत्न कधी कमी पडू देत नाही, आणि निराश होत नाही.. मला दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण परिचय झाला आहे, तेव्हा त्याचे नियंत्रण आता मी माझ्या हाती घेतले आहे..

आज खूप महिन्यांयी ब्लॉगवर लिहायला घेतलेय॥ मला माहीत नाही की नित्यनेमाने मी लिहीन की नाही॥ हे असेच आहे॥ नियमितता एकूणच स्वभावात नाही, त्याचाच परिपाक म्हणजे सध्याची परिस्थिती! माझ्या अजेंड्यावर नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टी असतात। जसे व्यायाम.. एकदा चालु केला की मग २-३, कधी ४ महिने मी सलग, न चुकता व्यायाम करीत रहातो.. पण मग काहीतरी घडतं आणि व्यायाम थांबतो.. पुन्हा चालु करणं होत नाही.. मग काही दिवसांनी पुन्हा सूर्यनमस्कार चालू करायचे.. मग ते बंद .. मग योगासने.. त्याचही असंच.. असंच ब्लॉगचपण...

पण तरीही मी थकत नाही.. तात्पुरता निराश होतो.. किती नुकसान झाले याचा अंदाज घेतो आणि काही दिवसांनी पुन्हा नव्या गोष्टीला सुरुवात करतो.. सध्या माझ्या अजेंड्यावरती आहे.. सूर्योपासना.. कशी? तर.. तीन प्रकारे.. १. सूर्यनमस्कार. २. गायत्री मंत्राचा जप. ३. अग्निहोत्र. आणि याला पूरक गोष्ट म्हणजे योगासने.. विशेषत: भस्त्रिका प्राणायाम..

अतिशय अस्थिर मनामुळे आणि ऊर्जेच्या खूप प्रमाणात होणार्‍या विकेंद्रीकरणामुळे [म्हणजे कधी हे बरे वाटणे, तर कधी ते, कुठल्याच गोष्टीवर न स्थिरावणे] सातत्याने अपयश येते हे मला कळते, पण... पण खूप मोठा आहे॥

असो॥ पण तरीही काही दिवसतरी मी ब्लॉग लिहीन अशी आशा करतो..

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: गुरू साक्षात परब्रम्ह तस्मैय श्री गुरुवे नम: