Monday, July 26, 2010

मागे वळून पहाताना..

आज वयाची ३५ वर्षे पुर्ण झाली.. अजूनही मोठे झाल्यासारखे वाटत नाही.. मन अजूनही आयुष्यात स्थिरावल्यासारखे वाटत नाही.. अजून वाटते काहीतरी मिस होतंय.. माझंच आयुष्य जगतोय असे वाटत नाही.. प्रत्येकवेळी नवीन विचार, नवीन आशा, नवी स्वप्ने.. आणि पुन्हा नव्याने स्वप्नभंग..

शाळेत असताना वाढदिवसाची वेगळीच गंमत होती.. केक कापून वगैरे कधी वाढदिवस साजरा व्हायचा नाही.. आई ओवाळायची.. काहीतरी गोड.. मग संध्याकाळी मित्रांना बोलवायचे.. मेनू जवळपास सेमच असायचा.. भडंग आणि जिलेबी.. कधीतरी इकडेतिकडे होत असेल..

पण बंधूसाठी [सुहास] मात्र माझा वाढदिवस जिव्हाळ्याचा विषय असायचा.. त्याच एकूनच माझ्यावर खूप प्रेम.. तेवढ्याच अपेक्षापण.. [मी त्या पूर्ण करू शकलो नाही ही गोष्ट अलाहीदा..] पण मी कॉलेजला असताना वाढदिवसाच्या वेळी कुंडलला जायचो त्यावेळी तो न चुकता मला ड्रेस घ्यायचा.. हे त्याचे नेहमीचे ठरलेले.. मग परत येताना पैसे द्यायचा.. मी परत येताना खूप भावनाविवश व्हायचो.. या सगळ्यांची स्वप्ने पूर्ण करायची.. मोठे व्हायचे.. यांना सुख द्यायचे.. असे विचार एसटीत बसलो की करत र्‍हायचो..

आज मागे वळून पहाताना वाटते.. आता प्राधान्यक्रम खूप बदलले आहेत.. दर महिन्याची तोंडमिळवणी हीच एक प्राथमिक गरज बनली आहे.. आणि माझ्याविषयीच्या घरच्यांच्या स्वप्नांना माझ्या मुलात बघतोय.. अर्थात असे असले तरी खोलवर उरात अजूनही आशा जिवंत आहे..

मागे वळून बघताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट जाणवते ती म्हणजे मी कमालीचा बदललो.. मी जसा होतो आणि जसा आहे यात खूपच अंतर आहे.. आणि याबद्दल मात्र मला नितांत अभिमान आहे.. आणि अजूनही ती बदलाची प्रक्रिया चालूच आहे.. नित्यनवे चांगले विचार आत्मसात करायचे, अंगवळणी पाडायचे.. आणि जसे आपण अंघोळ करुन आरशासमोर आपले स्वच्छ रूप पहातो तसे स्वत:ला पहायचे.. ही एक प्रकारची स्वयंप्रेरणाच असते..

यश हे आभासी असते असे मला वाटते.. म्हणजे क्षितीजासारखे.. यदाकदाचित क्षितीजावर पोहोचलो तरी काही क्षणांत समोर दुसरे क्षितीज दिसू लागते..

एक गोष्ट नक्की आहे.. पूर्वी मी जेव्हा वाटचालीचा आढावा घ्यायचो तेव्हा केवळ निराशच व्हायचो.. काय नाही तेच दिसायचे.. पण आता मात्र काय कमी आहे याबरोबरच काय काय आहे हेही दिसते.. हेही नसे थोडके!!

अन आजच्या दिवशी मी आशा करतो की असा दिवस येईल की त्यादिवशी मला "काय काय आहे" एवढेच दिसेल..

थ्री चिअर्स....

No comments: