Monday, December 1, 2008

एक महत्वाचा लेख.. धनंजय दिवाली अंक २००५ - गांधीवध आणि मी .. प्रा. मधुकर तोरडमल..

त्यावेळी मी सांताक्रुजला माझ्या काकांच्याकडे शिक्षणासाठी रहात असे। शुक्रवार, ता. ३० जानेवारी १९४८ या दिवशी शाळा सुटल्यानंतर आम्ही बंगल्यासमोरच्या अंगणात क्रिकेट खेळत होतो. माझी मावसबहिण शशिकला रेडिओ ऐकत हॉलमध्ये बसलेली होती. संध्याकाळचा साडेपाचचा सुमार होता. अचानक शशिकला ओरडत व्हरांड्यात आली. "गांधींना मारलं, गांधींना मारलं!" आम्ही धावत रेडिओभोवती जमा झालो. बातमी कानावर पडू लागली - "रोजच्या परिपाठाप्रमाणे संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी बापू आभा आणि मनूच्या खांद्यावर हात ठेऊन प्रार्थनास्थळाकडे जात होते. प्रार्थनेसाठी हजारभर स्त्री-पुरुष जमा झालेले होते. त्यांपैकी एक बुशशर्ट आणि पॅंट घातलेला माणूस बापूंच्या पुढे आला आणि वाकून त्यांच्या पायांना स्पर्श करू लागला. मनूने त्याला बाजूला करण्याच प्रयत्न केला. पण त्या दणकट माणसाने डाव्या हाताने मनूला बाजूला ढकलले आणि उजव्या हाताने पॅंटीच्या खिशातली पिस्तूल काढून लागोपाठ तीन गोळ्या बापूंच्यावर झाडल्या. "हे राम" असे उद्गारून बापू खाली कोसळले, त्यावेळी ५ वाजून १७ मिनिटे झालेली होती."

आम्ही सर्व १४ ते १५ अशा वयोगटातले शाळकरी विद्यार्थी होतो। त्या अपरिपक्व वयोगटाला शोभतील अशीच आमची मते होती. माझा मावसभाऊ बाळ ससे उद्गारला, "बरं झालं म्हातार्‍याला उडवला. आमरण उपास करण्याच्या धमक्या देऊन नेहरू-पटेलांना ब्लॅकमेल करीत होता!"

"मुस्लीमांचा फार पुळका त्याला। त्यांच्यापैकीच कुणीतरी मारलं शेवटी. सापाला कितीही दूध पाजलं तरी तो डंख मारल्याशिवाय राहील का?" दुसर्‍याने अक्कल पाजळली.
"पण आता त्यांची खैर नाही हं, कत्लेआम!"
"ते पण गप्प बसणारे नाहीत. पुन्हा सगळा देश पेटणार. रक्ताचे पाट वाहणार!"
"आपल्या मुंबईत तर कहर होईल।"आम्ही शाळकरी मुलं तोंडाला येयील ते बोलत होतो. आमच्या तोंडून जणू देशातल्या प्रत्येकाच्या मनातली भीतीच बोलत होती. पण या भीतीचे निवारण करणारी बातमीही लवकरच प्रसारीत करण्यात आली. बापूंच्यावर गोळ्या झाडून त्यांचा प्राण घेणारा कुणी मुस्लीम नव्हता, तर हिंदूच होता. तो हिंदूही कुणी निर्वासित सिंधी-पंजाबी असा परप्रांतीय नव्हता तर आमच्या महाराष्ट्रातला, महाराष्ट्रातल्या पुण्याचा, पुण्यातल्या ब्राह्मणाचा, ब्राह्मणातल्या हिंदूमहासभावाल्यांचा होता.
आता कत्तल, जाळपोळ, लुटालूट सुरू झाली ती आमच्याच घरात. कुणा गोडसेला गादीत गुंडाळून जाळण्यात आले. कुणा देशपांड्यांचे घरदार लुटण्यात आले. नगरला आमच्या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बागड्यांचा मोठा वाडा भस्मसात करण्यात आला. कोल्हापूला भालजी पेंढारकर यांचा स्टुडिओ जाळून टाकण्यात आला. बोलपटांच्या खाणीचे रूपांतर कोळश्याच्या खाणीत झाले. या सर्व अत्याचारांना कारणीभूत झालेल्या मारेकर्‍याचे नाव होते नथुराम गोडसे! त्याला जागच्या जागीच अटक करण्यात आली. पण हे एकट्याचे कृत्य नाही. यामागे अनेकांचे हात असावेत असा सरकारचा संशय होता. कारण मंगळवार २० जानेवरी १९४८ रोजी म्हणजे केवळ दहाच दिवस आधी संध्याकाळच्या प्रार्थेनेच्या वेळीच गांधीजींच्यापासून केवळ सत्तर फूट अंतरावर एक गावठी बॉंब फोडण्यात आलेला होता. वीस वर्षे वयाच्या मदन्लाल पहावा नावाच्या पंजाबी निर्वासिताने हा स्फोट घडविला असावा असा पोलिसांचा संशया होता. त्याला अटकही करण्यात आलेली होती, आणि आता तर बापूंचा खूनच करण्यात आलेला होता।
अटकसत्र सुरू झाले. नथुरामचा धाकटा भाऊ गोपाळ याला अटक झाली आणि सगळ्यांत नवल म्हणजे स्वातंत्रवीर सावरकरांनाही अटक झाली. नगरचे आपटे आणि करकरे यांनी स्वत:ला अटक करवून घेतली.

No comments: