Tuesday, December 16, 2008

योग्या गेला !!

माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील एक काळा दिवस म्हणजे गुरुवार, दिनांक ११ डिसेंबर २००८.. रात्रीचे जेवण घेत होतो.. खरंतरं दुपारपासूनच अस्वस्थता होती.. संध्याकाळी ती जराशी वाढलीच होती.. पण वाटलं होतं कदाचित सकाळी व्यायाम न केल्याने आणि उपवास असल्यानेही असेल .. सुनिताबरोबर किरकोळ वादही झाला त्यावरुन.. ती म्हणाली, "आता कुणा मित्राचा फोन आला तर जाशील की नाही?" मी म्हटलं, "नाही जाणार, आज मूड नाही म्हणून सांगीन." मोबाईल वर FM सुरु होते.. अचानक फोन वाजला.. हरीचा होता .. पण मोबईलचे हेडसेट काढून फोन घेइपर्यंत फोन बंद झाला होता.. हरीचा फोन क्वचित यायचा, म्हणजे नाहीतच जमा.. त्यामुळे फोन कशासाठी असेल याचा तर्कवितर्क सुरु झाला.. विचार केला करु नंतर फोन.. थोड्या वेळानी त्याचाच फोन परत आला.. फोन घेतला.. म्हटलं "बोला, हरीभाऊ.."
हरीचा आवाज वेगळाच होता.. कातर आवाज म्हणू .. आणि त्याच पहिलं वाक्य, "विकास, योग्या गेला की रे.." माझ्या मनाने, कानाने हे वाक्य स्वीकारलेच नाही.. मी पुन्हा विचारले.. "काय झालं?".. त्याने सांगितले, "अरे आपला योगेश गेला की रे.." पुन्हा मनाचा नकार, मी विचारले, "काय झालं काय?" हरी म्हणाला, "अक्सिडेंट झाला रे त्यात योगेश गेला" मी म्हटलं "काय सांगतोयेस काय हरी.." मला म्हणायाचे होते तु योग्याबद्दल असं कसं म्हणू शकतोस.. तुझी खात्री आहे का? पुन्हा त्याचे तेच.. पुढचे सगळे प्रश्न मी विचारले ते गोंधळातच.. कुठे, कसा, कधी वगैरे..
तो म्हणाला, तु निघतोस ना। मी म्हणालो "होय, लगेच." हरी म्हणाला मी जाऊन येतो तिकडे॥ फोन बंद केला.. पण काही केल्या विश्वास बसत नव्हता.. काय करावे सुचत नव्हतं.. हात कापायला लागले.. मग आठवला पम्या, प्रमोद कुलकर्णी, योगेशचा चुलतभाऊ.. त्याला फोन लावला.. त्याचा आवाज उत्साही वाटला.. मी म्हणालो, कुठे आहेस?, तो म्हणाला, "पुण्यात".. मी म्हणालो, "अरे योगेशचे काय?"

"अरे त्याचा अस्किडेंट झालाय, आणि बहुतेक तो जागेवरच संपलाय."काय आणि कसं लिहू काय अवस्था झाली होती.. डोके धरूनच कॉटवर बसलो.. खूप खूप जोराने ओरडावे असे वाटत होते.. बातमी दोन ठिकानाहून कन्फर्म झाल्यामुळे खोट्या आशेला काहीही वाव नव्ह्ता.. मन मानायला तयार नव्हते..
कसली नियती ही? त्याला क्षणभराचाही अवधी दिला नव्हता.. ज्या क्षणी स्ट्रोक बसला त्याच किंवा पुढच्या क्षणाला त्याने देह सोडला होता..
मोहमाया योग्याला नव्हतीच कधी.. ज्याची होती त्याचा पुरेपूर उपभोग घेतला त्याने.. तेच कशाला.. सगळं आयुष्यचं तो रसरसून जगला.. मला वाटत पु. लं. जसे मस्तीत, धुंदीत जगले, योग्या अगदी तसाच जगला.. पठ्ठ्या जाइल तिथे मैफील जमवायचा.. आणि त्या प्रत्येक मैफीलीचा तो अनभिषिक्त सम्राट तो असायचा.. अफाट जन्मजात बुध्दीमत्ता, पचंड आकलनशक्ती, एकपाठी, उत्तम बोलणे असे की एकणार्‍याने चित्तवृती आणि देहाचा कान करून एकावे.. आणि त्याची म्हत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची विनोदबुद्धी.. सगलंच कसं अफलातून.. कलंदर, अवलिया काहीही म्हणा.. कशाचीही अतिशयोक्ती होणार नाही..
मी मुलखाचा सिरीयस माणूस.. पण योग्या भेटल्यापासून काही दिवसातच मी त्याच्यासमोर सिरीयस व्हायचे सोडून दिले.. नाहीतर हमखास टिंगळटवाळी व्हायची..
अनेकानेक घटना, गोष्टी आठवताहेत.. आता काय नुसत्या आठवणीच..
जशी माझी स्थिती आहे, तशीच अनेकांची आहे, यामधे हरी प्रामुख्याने येतो.. मी तर म्हनेन माझ्यापेक्षा त्याचे दु:ख जास्त आहे.. त्यांनी खूप आयुष्य एकत्र घालवले.. खूप एन्जॉय केला.. सुख-दुखं बघितली.. एकत्र काम केले.. त्यांच्या मैत्रीची वीण खूपच घट्ट होती, म्हणूनच तर जाण्यापूर्वी काही दिवस तो हरीला येऊन भेटून गेला.. गप्पा मारून, फोटो काढून, वहिनींजवळ हक्काने पोहे मागून.. काय आणि काय..
आणि मी दुर्दैवी.. गेली कित्येक दिवस त्याची आठ्वण होत असूनदेखील, जाऊया जाऊया करत जायचे राहून गेले.. फोन करायचे तर योग्य वेळेसाठी राहून गेले... म्हणजे माझं काम सकाळी, त्याचं दुपारनंतर रात्रीपर्यंत..
माझ्या आयुष्यात फार कमी मित्र आहेत.. योग्या त्यांपैकी एक.. तो असणं खूप काही होतं माझ्यासाठी.. बाहेरचा विध्वंस दिसू शकतो.. आतल्याच काय..?
आता काही लिहिवत नाही ..

No comments: